पेटलेल्या दिव्यामधील
मिणमिणती वात म्हण
तुझ्या उमेदीला दिलेली
नशिबाने मात म्हण
पण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय
तुच दिली आस मला
तुच दिला प्राण हा
तुच माझी माता व्हावी
मिळावा सन्मान हा
हक्क आहे तो माझा मला ही जग बघायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय
माझा गुन्हा, माझा दोष
मला काहीच कळत नाही
का करते तु माझ्यावर रोष
मला काहीच कळंत नाही
तु ही कधी मुलगी होती हे मी का तुला सांगायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय
नको समजुस मी तुला
जिंदगीभरचा भार होईल
दुर्गा होईल, शक्ती होईल
मी तुझा आधार होईल
समजावुन सांग तु तुझ्या मनाला असं नाही वागायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय