१.
वसंत येतो तेव्हा फुले येतात,
असे पुस्तकात वाचलेले;
फुलें येतात तेव्हा वसंत असतो,
हे स्वतः पाहिलेले…
२.
गळून पडलेली रंगीबेरंगी फुले…
ती पुरती विवर्ण झाल्याखेरीज
मातीही त्यांना सामावून घेणार नाही.
३.
वृक्षातळी पडलेली ही फुले…
त्यांनी मातीशी
पुनर्जन्मासाठी धरणे धरले आहे.
४.
झाडाचा निरोप घेणारे फुल
“येते मी” म्हणते आणि
झाडाच्याच पायाशी अंग टाकते…
“प्राक्तनाचे संदर्भ”, द. भा. धामणस्कर