कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व
की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती
पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक
दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे
खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले
खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात
की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच
आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म
जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांधल्या प्रमाणे
ते काहीही असो,
आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे
मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान
– रोहन.