तू सोबत असताना रिमझिम घेऊ का
हवीहवीशी काही जोखिम घेऊ का
परवडणाऱ्या व्यथावेदना जर माझ्या
लिहायला मग महागडे रिम घेऊ का
अस्तर दुनियेच्या नजरेचे टोचू दे
तिच्या कटाक्षामधले रेशिम घेऊ का
मनाशीच शिवतो बनियनची भोके तो
लेक विचारत असतो डेनिम घेऊ का
सात जन्म तर रेंजमध्ये असणार तुझ्या
सांग आठव्या जन्माचे सिम घेऊ का
मनाप्रमाणे तुझ्या जन्मतो जगतो की
श्वास तरी मर्जीने अंतिम घेऊ का
भक्ती पोर्टेबल असते का सांग तुझी
नव्या मंदिरी आहे फ्री स्कीम घेऊ का
— अभिजीत दाते