राखेमधला एक निखारा वर आला
काळजातला जुना शहारा वर आला
कैद किती अश्रू केले हृदयामध्ये
फरार झाला एक बिचारा वर आला
प्रेम, समर्पण,स्वप्ने, इच्छा आकांक्षा
भार विवाहामधल्या हारावर आला
साक्ष, पुरावे असून सुटले घाव जुने
आळ फक्त शेवटच्या वारावर आला
आकाशाला कीव असावी आलेली
तुटण्यासाठी बहुधा तारा वर आला
— अभिजीत दाते