दररोज अंगवळणी असले तरी
एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते
मग चुकत जातात हळूहळू
शंका कुशंकांची त्रिकोणे
आणि आपला शोध फिरत राहतो
गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर
माणसं येतात, स्पर्शून जातात
स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत
आपण आतच अडकून पडतो
चक्रव्यूहात…अभिमन्यू बनून
गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात
गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो
मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल
गावात पसरलेला भावनांचा कुबट वास
विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून
राहतात प्लास्टिक सारख्या…बाभळीला
कॅफिन, निकोटिन, मोर्फीन,
भरत जातो साठा शरीरामध्ये
डोपामाईन, अड्रेनलिन, चे झरे
मिसळून जातात रक्ताच्या नद्यांमध्ये
हळूहळू गोठत जातात नद्या
ओसाड पडू लागतात त्यांचे किनारे
वाळवंट…समुद्राला मिळण्यापूर्वीच
रात्री भयाण वाटू लागतात, तारे भेसूर
हवा वाहत राहते दूरवरचे अणुकीरण घेऊन
श्वापदांचा भेसूर आवाज,
घड्याळाची भेसूर टिकटिक
रातकिड्यांची भेसूर किरकिर
ऐकावी लागणार आहे….बहिरे होण्यापूर्वी
गळ्याला पडलेली कोरड, दुष्काळासारखी
अंगावर फणफणणारे शहारे, सापसारखे
पापण्यांवर पडलेला भार, गंजल्यासारखा
आत चाललेला कालवा, अंत्ययात्रेसारखा
हे ओसाडपण थांबवायला हव…मरणापूर्वी
पायरी नको चुकायला पुन्हा
नको पुन्हा तो चक्रव्यूह
नको तसली स्वप्न
नको झोप!
©प्रतिक सोमवंशी