कधी तुझ्यास्तव
मनांत भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवांत जे घर
बांधुनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!
तव शरीरातुन
कधी पेटती
लाल किरमिजी
हजार ज्योती
त्यात मिळाया
पतंग होतो
परी नसे तो
काम वगैरे!
कधी शिवालय
पांघरुनी तू
समोर येता
विरती हेतू
मनात उरते
मात्र समर्पण
मी नसतो पण
भक्त वगैरे!
रंगीत असले
धुके धराया
सार्थ शब्द हे
अपरे वाया
त्या पलिकडचा
एक जरासा
दिसे बरासा
फक्त वगैरे!
कुसुमाग्रज