कंदील विकणारी मुले

उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांना
परोपरीने सजवून विकणारी ही मुले या
दिवाळीची खरेदी करीत हिंडणा-या
श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत…
त्यांचे खानदान मुळातच वेगळे :
ती आली आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून;
किंवा संप-टाळेबंदीत हकनाक
देशोधडीला लागलेल्या कुटुंबांतून;
किंवा कर्त्याच्या अपमृत्यूने
छ्प्पर उडालेल्या घरांमधून; किंवा
आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर
जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून…
थोडक्यात म्हणजे, कायमची
रात्र असलेल्या प्रदेशातील ही
अभागी मुले…
त्यांना आहे एकदम मान्य तुमचा
सर्वाधिकार प्रकाशावरचा. म्हणून तर ती
तुमचाच प्रकाश अधिक वैभवशाली दिसावा यासाठी
काठ्यांना रंगीबेरंगी आकाशकंदील अडकवून
भर बाजारात
तुमचीच वाट पाहत उभी आहेत…

द. भा. धामणस्कर

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *