तिचे अबोल नकार अध्याहृत,
म्हणून रुजलेली ही अतींद्रिय फुले
आजूबाजूस,
तिची पाऊलवाट चुकवून….
पण सुरक्षित पाऊलवाटही
पायांतून रक्त काढील, तेव्हा
बेमालूम रक्तात मिसळेल फुलांचा रंग
ती कसा नाकारील ?
रुजू घातलेल्या फुलाचे काय
टी कुठूनही वाट काढतील :
जमिनीतून हवेत,
हवेतून रक्तात –
हे मी तिला पूर्वीच सांगितलेले,
ईश्वरानेही फुले रुजू घालण्यापूर्वी ….
प्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर