कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर
म्हणून शब्दांना धार लावत
बसलेत लोक घरोघर,
किती जन्मांचा गिळलाय द्वेष
जो ओकला जातोय
पायऱ्यापायऱ्यांवर.
कुठला पडणार आहे बॉम्ब
म्हणून लपतायत लोक
जाती-धर्माच्या तळघरात,
घाबरलेला उजेड
नेमका कसा अडकला
अंधाराच्या जबड्यात.
एवढी कशी घडण तकलादू
दुखावली जातेय
पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं,
हा कुठला महासेल
जिथं कुजका विचार
विकला जातोय चढ्या भावानं.
तत्पूर्वी – दासू वैद्य