मी पृथ्वीचा; पाण्याचा
चुकून शिडकावा झाला तरी
उमलून येणारा…
मी पाण्याचा;पदरी पडेल
ते स्वीकारीत विनातक्रार
पुढे जाणारा…
मी तेजाचा;
जिवंतपणाच्या हरेक उत्सवाचा
प्राण असलेला…
मी वाऱ्याचा; ताजेपण
अखंडित राखण्यासाठी
सतत वाहणारा …
मी आकाशाचा; भिंतींनी
घेरला जात असतानाही आपले
आकाश सांभाळणारा…
“बरेच काही उगवून आलेले “, द भा धामणस्कर