कवितेची वही गच्च भरून गेलिय
आता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत…
काही अशीच वा-यावर सोडून द्यावीत
ज्यांची दूर विजनात गाणी होतील,
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील,
काही पाखरांना द्यावीत
त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल
त्यांनाच परत केल्यासारखी,
काही ढगांवर डकवावीत
जी देशाच्या सीमा ओलांडताना
आपोआपच रूपांतरीत होतील…
नंतर
ज्यांची दूर विजनात गाणी होणार नाहीत
जी नाकारतील वाहणे नव्याने,
ज्यांचा कुठल्याच कोलाहलाशी संबंध नाही,
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायच्या नाहीत
अशी काही पाने उरतीलच, ती सर्व
कुठल्याही झाडाच्या तळाशी बहर आहात, असे
मीच त्यांना कैकदा सांगितलेले आहे.
– प्राक्तनाचे संदर्भ, द. भा. धामणस्कर