उंबऱ्यावरचे माप सांडून
मी आत, घरात आले,
दोन डोळ्यांतली ज्योत झाले,
माझे डोळे खाली वळले.
भुई म्हणाली, ‘तू माझी!
काढ केर, स्वच्छ कर.’
मी म्हटलं, ‘खरंच गं आई’
केरसुणी झाले, रांगोळी झाले.
चूल म्हणाली, ‘तू माझी.’
मी तिची लाकडं झाले.
जातं म्हणालं, ‘तू माझी.’
गहू झाले, ज्वारी झाले.
उखळीतलं भात झाले;
ताकातली रवी होऊन
मथणीत नाचत राहिले.
भिंत होऊन, छप्पर होऊन,
गुपितं राखली, छिद्रं झाकली;
पणती, वात, तेल होऊन
कोनेकोपरे उजळून टाकले.
सून झाले, बायको झाले,
आई झाले, सासू झाले,
माझी मला हरवून बसले.
आता सोंगे पुरे झाली;
सारी ओझी जड झाली.
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे;
तुकडे तुकडे जमवू दे.
विशाल काही पुजू दे.
मोकळा श्वास घेऊ दे.
श्वास दिला, त्याचा ध्यास
घेत घेत जाऊ दे!
– पद्मा गोळे