कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांग
देणे घेणे उतू गेले फिटले ना पांग
आता कशी श्वासांवर लावायाची बोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली
कधीकाळी होते इथे एक गर्द रान
एका बहराची ज्याने मिरवली आण
सरूपाला अरुपाची जाहली सवय
तेंव्हाचे हे भय ज्याचे झाले आता वय
एका खिळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली
आता माझ्या प्रार्थनेत तेवढा ना पीळ
आणि तुझ्या निळाईत नाही घननीळ
मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर
जीव ऐलतीर आणि डोळे पैलतीर
कोरड्या पात्रात उभी आठवण ओली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली
– वैभव जोशी