१
कौतुक झाडांचे करावे,
ती पाखरांसारखी नंतर उडून जात नाहीत:
तुमच्यासाठी फक्त एक
निरभ्र आकाश ठेऊन !
२
पानांना झाड
अनावश्यक वाटू लागले की त्यांना
पाचोळा व्हायचे वेध लागलेले असतात!
३
उजडण्यापूर्वीच
या छोट्या बागेतील पिवळी पाने
मला झाडून टाकली पाहिजेत:
कालची शुष्क पाने पाहात झाडांनी
परत पाने गळू नयेत म्हणून!
भरून आलेले आकाश, द. भा. धामणस्कर