प्रार्थनांचे दर बदलतो
पण कुठे ईश्वर बदलतो
देवपण हे सुटत नाही
शेंदराचा थर बदलतो
काय चिंता मालकाला
सारखा नोकर बदलतो
खीर तो खाऊन घेतो
शेवटी घागर बदलतो
प्रश्न साधासाच केला
तू किती उत्तर बदलतो
तेच ते प्रत्येक वर्षी
फक्त कॅलेंडर बदलतो
तू बदल आधी स्वत:ला
मी तुला नंतर बदलतो
— अभिजीत दाते