उजेड सारे अर्ध्यातुन जर वळले नसते
काळोखाला काही काही कळले नसते
जीवच जडला नसता जर का मातीवरती
आभाळाचे पाय जराही मळले नसते
उदयाने जर लाही लाही केली नसती
भर माध्यान्ही माझे मीपण ढळले नसते
त्या वा-याने पाठ फिरवली नसती तर मग
ह्या झाडावर हे पक्षी आढळले नसते
चार क्षणांनी भरते ह्या पोटाची खळगी
नाहीतर काळाला कोणी दळले नसते
कोणी कोणी कोणासाठी कोणी नसता
कोणासाठी कोणीही कळवळले नसते
:- वैभव जोशी