झाडांनी अरण्य करायचे ठरविले, तेव्हा
पाखरांना गुप्त संदेश गेले बीजपेरणीसाठी,
जमिनी तोडून दिल्या श्वापदांना जहागिरीप्रमाणे
आणि उभारल्या वसाहती तक्षकांच्या जागोजाग
आगंतुकांच्या निर्दालनासाठी . . .
मग मात्र, निश्चिन्त झाडे
फंद्यात फांद्या अडकवून
अंतहीन आकाशासारखी उभी राहिली . . .
“प्राक्तनाचे संदर्भ”, द. भा. धामणस्कर