चित्र काढ म्हणालीस तेव्हा
कविता लिहीत बसलो
कविता लिही म्हणालीस तेव्हा
नुसताच शून्यात बघून हसलो
शून्यात बघू नकोस
म्हणालीस तेव्हा
तुझ्या डोळ्यांत बघत होतो
तुझ्याप्रमाणे नाही तरी
माझ्यापरीने जगत होतो
ह्याला काय जगणं म्हणतात का
म्हणालीस तेव्हा
अनेक मरणं भोगून झाली होती
तुला भोग कळे कळेतो
वासना वेशीवर टांगून झाली होती
वेस कुठंय म्हणालीस तेव्हा
वेशीपल्याड गेलो होतो
तू रे कोण? म्हणालीस तेव्हा
मी तर तूच झालो होतो
आता तू ही डोळे असून
डोळ्यांदेखत विरते आहेस
माझी कविता भाळी गोंदून
चित्र म्हणवत फिरते आहेस
:- वैभव जोशी